कुष्ठरोग तंत्रज्ञांचे त्वचाविलेपन उजळणी प्रशिक्षण

अमरावती /11 डिसेंबर : कोठारा लेप्रसी मिशन हॉस्पिटल आणि सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या वतीने सोमवार, दि. 8 डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये कार्यरत कुष्ठरोग तंत्रज्ञांचे त्वचाविलेपन उजळणी प्रशिक्षण पार पडले. कोठारा लेप्रसी हॉस्पिटल येथे हे प्रशिक्षण घेण्यात आले.
कुष्ठरोग आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली ही तपासणी आहे. सर्वसामान्यपणे वैद्यकीय व्यावसायिकांद्वारे लक्षणांवरून कुष्ठरोग आजाराचे निदान वैद्यकीय तपासणीद्वारे निश्चित केले जाते. निदानास कठीण असलेल्या रुग्णांकरिता किंवा गुंतागुंतीच्या रुग्णांकरिता त्वचा विलेपन पद्धतीद्वारे निदान केले जाते. ही तपासणी कोठारा लेप्रसी हॉस्पिटल आणि डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांच्या सोईकरिता ही तपासणी कुष्ठरोग तंत्रज्ञांना सुलभतेने करता यावी, याकरिता एक दिवसीय उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. सौरभ देशमुख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचे निदान करण्यासाठी त्वचा विलेपनाची प्रक्रिया आणि प्रयोगशाळेतील तपासणी याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींकडून प्रात्यक्षिकेही करण्यात आली. समारोपाप्रसंगी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. पूनम मोहोकार यांनी 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा शून्य प्रसार ध्येय साध्य करण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनंती नवरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, सल्लागार सुरेश धोंडगे यांनी मार्गदर्शन केले.




