श्री हव्याप्र मंडळाचा दिल्ली येथील युनेस्कोच्या बैठकीत प्रभावी सहभाग
प्रा. प्रणव चेंडके यांची भारतीय पारंपरिक खेळांना सांस्कृतिक वारसा देण्यावर आग्रही भूमिका

अमरावती /10 डिसेंबर : 8 डिसेंबरपासून दिल्लीत सुरू झालेल्या युनेस्को च्या आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा 12 व्या सत्रात, युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश होण्याची शक्यता आहे. नामांकनांची तपासणी केल्यानंतर, 10 डिसेंबर रोजी घोषणा अपेक्षित असून या बैठकीमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रमुख व युनेस्को सल्लागार समिती सदस्य प्रा. प्रणव चेंडके यांनी भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा संस्कृतीला सुद्धा जागतिक वारसा मान्यतेला प्राधान्य देण्यात यावे अशी आग्रही भूमिका युनेस्को च्या बैठकीमध्ये मांडली. युनेस्को चे सल्लागार म्हणून प्रा. प्रणव चेंडके यांनी यापूर्वी सुद्धा पॅरिस, मोरोक्को, मेक्सिको, जर्मनी, साऊथ आफ्रिका सह दहा देशांमध्ये भेटी देत जपान व कोलंबिया येथे कार्यशाळा घेत येथील जिवंत सांस्कृतिक वारसा मान्यतेबाबत यशस्वी कार्य केले आहे.
जागतिक स्तरावर सांस्कृतिक स्वरूपात असलेला वारसा प्रभावीपणे जतन व्हावा याकरिता युनेस्को मध्ये एक आंतरराष्ट्रीय अमूर्त संस्कृती सामिती जागतिकस्तरावर कार्य करीत आहे. या समितीमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील अनेक वर्षांपासून सल्लागार सदस्य म्हणून यशस्वी भूमिका पार पडत आहे. दिल्लीमध्ये प्रथमच होत असलेल्या अमूर्त सांस्कृतिक बैठकीमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रासारक मंडळ भारतीय पारंपरिक खेळ व क्रीडा संस्कृती ला वैश्विक व्यासपीठ देण्यावर यशस्वी कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाचे आंतरराष्ट्रीय प्रमुख समन्वयक प्रा. प्रणव चेंडके युनेस्को सल्लागार समिती सदस्य म्हणून जागतिक व्यासपीठावर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे यशस्वी प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी या महत्वपूर्ण बैठकीमध्ये भारतीय क्रीडा संस्कृतीची अभ्यासपूर्ण माहिती देत या खेळांना जागतिक वारसा मिळावा अशी आग्रही भूमिका मांडली. प्रा. प्रणव चेंडके यांच्या प्रभावी सादरीकरणाबाबत मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी कौतुक केले असून मंडळाचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे प्रा. प्रणव चेंडके यांनी अभिनंदन करण्यात येत आहे.
भारतीय खेळांना जागतिक वारसा मिळावा : प्रा. प्रणव चेंडके
देशात प्रथमच युनेस्को च्या बैठकीत जिवंत वारसा संरक्षणासाठी नवीन नाविन्यपूर्ण उपायांवर चर्चा होत आहे. शिक्षण, संस्कृती, पर्यटन, स्थानिक कला (हस्तकला) संरक्षण, उत्सव, युनेस्कोचे उपक्रम यावर मार्गदर्शन होत असतांना देशात अनेक पारंपरिक खेळ सुद्धा याचा जिवंत वारसा मध्ये येतात. या विषयाची माहिती देतांना प्रा. प्रणव चेंडके यांनी भारतीय सांस्कृतिक व पारंपरिक खेळांबाबत माहिती दिली. भारतातील जिवंत वारसा असणार्या खेळांमध्ये कबड्डी, खो-खो, गिली-दांडा, लगोरी, सागरगोटे यांसारख्या मैदानी खेळांचा समावेश आहे, जे शारीरिक क्षमता आणि सांघिक कार्याला प्रोत्साहन देतात, तर बुद्धिबळ (चतुरंग), कॅरम, लुडो, यासारखे बैठे खेळ, तसेच मर्दानी खेळ (तलवारबाजी, भालोक) आणि हॉकी (राष्ट्रीय खेळ) हे आहेत.




