सर्व संवैधानिक संस्थावर आरएसएसचा ताबा
निवडणूक आयोगही ताब्यात घेतला जातोय

* विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची लोकसभेत घणाघाती टीका
नवी दिल्ली /9 डिसेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) देशातील सर्व संस्थांवर कब्जा करायचा आहे. निवडणूक आयोगावर ताबा मिळवला जात आहे.
भाजप पूर्णपणे निवडणूक आयोगाचा वापर करत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. लोकसभेत आज (मंगळवार) निवडणूक सुधारणा आणि विशेष पुनर्रिक्षण यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत राहुल गांधी सहभागी झाले.लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ईडी, सीबीआय, आयबी, आयकर यांसारख्या सर्व विभागांवर ताबा मिळवला जात आहे, आरएसएसकडून हे प्रयत्न सुरु आहेत. राहुल गांधी यांच्या पूर्वी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सभागृहाला संबोधित केले. अखिलेश यादव म्हणाले की, एसआयआरच्या माध्यमातून अंतर्गत पद्धतीने एनआरसीचे काम सुरु आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज सातव्या दिवशी लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा होत आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीत सुधारणा अतिशय गरजेच्या आहेत. मशीन रिडेबल मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या एक महिना आधी दिल्या पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज डम्प करण्याच्या नियमांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. आम्ही ज्या ईव्हीएम मशीनद्वारे मतदार करत आहोत, त्या ईव्हीएम मशीन आम्हाला पाहू दिल्या पाहिजे. देशामध्ये व्होट चोरीचा मुद्दा गंभीर आहे. व्होट चोरी हा देशद्रोह आहे. आपण एक महान लोकशाही देशाचे नागरिक आहोत. मात्र सरकारला निवडणुकीत सुधारणा नको आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.




