व्हॉट्सपवरील मतदार यादीबाबत उपविभागीय अधिकार्‍यांकडून खुलासा

अमरावती /5 डिसेंबर : अमरावती तहसील कार्यालयात सन 2002 ची मतदार यादी उपलब्ध असल्याचा एक व्हॉट्सप संदेश सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फिरत आहे. परंतु, हा संदेश पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, 4 डिसेंबर 2025 रोजी व्हॉट्सपवर एक संदेश प्रसारित झाला होता, ज्यात अमरावतीतील ज्या महिला परराज्यात स्थलां तरित आहेत, विशेषतः जिथे ’एसआयआर’ प्रक्रिया सुरू आहे, त्यांच्या आई-वडिलांचे नाव सन 2002 च्या मतदार यादीत शोधण्यासाठी अमरावती तहसील कार्यालयात ती यादी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयात सन 2002 ची मतदार यादी उपलब्ध नाही. या कार्यालयात नागरिकांसाठी सन 2004 ची मतदार यादी उपलब्ध आहे. उपविभागीय अधिकारी यांनी अमरावती अंतर्गतच्या सर्व मतदारांना कळविले आहे की, त्यांनी व्हॉट्सपवरील या चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. ज्यांना 2004 ची मतदार यादी हवी आहे, त्यांनी थेट तहसील कार्यालय, अमरावती येथील निवडणूक विभागात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button