सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

56 वर्षीय नराधम आरोपीला अटक

* शिरजगाव बंडमध्ये येथील धक्कादायक घटना

चांदूरबाजार /3 डिसेंबर : चांदूर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेले चांदूरबाजार शहरालगतच्या शिरजगाव बंड परिसरात सहा वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडलेला हा प्रकार शिरसगाव बंड येथील शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजू मुल्ला उर्फ रियाजुद्दीन जहिरुद्दीन मुल्ला (56) याने आपल्या शेजारी राहणार्‍या चिमुकल्या बालिकेला बिस्किट देण्याचे आमिष दाखवून शाळा परिसरात नेले आणि चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. परिसर निर्जन व शांत असल्याचा फायदा घेत नराधमाने हे कृत्य करण्यात आल्याचे फुटेजमधून दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच मुलीच्या आईने 3 डिसेंबर रोजी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध बीएनएस कलम 64(1), 65(2) तसेच पोस्को कलम 4, 6 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. चांदूरबाजार चे ठाणेदार अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक विनोद इंगळे आणि शिला ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
घटनेनंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर जमून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगावसारख्या अलीकडील प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळलेली असताना अमरावती जिल्ह्यातील हा प्रकार समाजमनाला पुन्हा एकदा हादरवून गेला आहे. अल्पवयीनांवरील वाढत्या अत्याचारांना रोखण्यासाठी आणखी कठोर कायदे आणि त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी जोर धरत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button