जावयाच्या घरावर साल्यानेच मारला 3 लाखाचा डल्ला
खोलापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती /3 डिसेंबर : जावायाच्या घरात पाहुणे म्हणून आलेल्या साळ्यानेच बेडरुममधील अलमारीतून 3 लाख 67 हजार 900 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना खोलापूर पोलिस ठाण्याच्या नवथल बु. गावात घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी सर्वेश सुधीर वानखेडे (22, साईनगर, दर्यापूर) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आशिष सुरेशराव खंडारे (31, नवथल बु.) हे कापूस व्यापारी आहेत. आरोपी 22 नोव्हेंबरला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. त्याच दिवशी तक्रारदार आणि त्यांची पत्नी एका समारंभाला जाण्यासाठी दागिने घालून गेले होते. परत आल्यानंतर दोघांनी दागिने सुरक्षितपणे अलमारीतील लॉकरमध्ये ठेवले.
पुढच्या दिवशी सर्वेश तिथून निघून गेला. दागिन्यांची पुन्हा तपासणी तक्रारदारांनी केली नाही. मात्र 1 डिसेंबरच्या सकाळी लॉकर उघडल्यावर दागिन्यांचा डबा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात इतर कुणीही आले नसल्याने संशय थेट साळा सर्वेशवर गेला. त्यानंतर त्यांनी ताबडतोब खोलापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




