पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 173 अब्ज डॉलरची गुंतवणूक

स्वित्झर्लंड /20 जानेवारी : जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत 2026 मध्ये सहभागाची सुरुवात करताना महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी सुमारे 14.5 लाख कोटी इतक्या गुंतवणूक सामंजस्य करारांची नोंद केली. ही रक्कम जवळपास संपूर्ण डावोस 2025 मध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीइतकी आहे.
अधिकृत माहितीनुसार, पहिल्या दिवशी एकूण 19 करार करण्यात आले असून त्यातून 15 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीची शक्यता आहे. या गुंतवणुका पायाभूत सुविधा, उत्पादन, अक्षय ऊर्जा, डिजिटल सेवा, अन्न प्रक्रिया आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये होणार आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या बाजारपेठा, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षमतेवर जागतिक गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दिसून येतो. वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन करून राज्याच्या डावोस मोहिमेला औपचारिक सुरुवात झाली. हा पॅव्हेलियन राज्य सरकार आणि जागतिक कंपन्यांमधील गुंतवणूक, विस्तार आणि दीर्घकालीन प्रकल्पांवरील चर्चेचे केंद्र ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांशी थेट बैठका घेतल्या. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत तसेच मुख्यमंत्री कार्यालय व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागामार्फत सुमारे 3.13 लाख कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांचे समन्वय करण्यात आले असून, त्यातून 4.4 लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. अक्षय ऊर्जा, ईव्ही, ग्रीन स्टील, जहाजबांधणी आणि डिजिटल पायाभूत सुविधा ही प्रमुख क्षेत्रे आहेत. शहरी पायाभूत सुविधांमध्येही मोठी गुंतवणूक झाली असून एमएमआरडीएनं वाहतूक, नागरी विकास आणि शहर आधुनिकीकरणासाठी सुमारे 11 लाख कोटींचे एमओयु आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत केले आहेत.
राज्य अधिकार्‍यांच्या मते, डावोस 2025 मध्ये झालेल्या अनेक गुंतवणूक करारांची अंमलबजावणी सुरू झाल्याने यंदाच्या परिषदेत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसत आहे. डावोस परिषदेचे पुढील सत्र सुरू असताना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राकडून आणखी महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button