लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा
विरोधकांच्या आरोपामुळे सभागृहात जोरदार खडाजंगी

* उपमुख्यमंत्री शिंदें यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार
नागपूर /10 डिसेंबर – शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत यासंदर्भातील लक्षवेधी मांडली. ज्यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. राज्यात सध्या 2 कोटी 43 लाख लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाली असल्याची माहिती यावेळी मंत्री तटकरेंनी दिली.
यानंतर लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ झालेला आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांना कामाला लावण्यात आले. त्यांना टार्गेट देण्यात आले. अमुक-अमुक फॉर्म भरून झालेच पाहिजेत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या कर्मचार्यांनी अनेक ठिकाणी बोगस फॉर्म भरले आहेत. या योजनेत मोठी गडबड झालेली आहे. या गडबडीला कोण जबाबदार आहे. या योजनेसाठी वापरण्यात आलेले पैसे हे सरकारवर बसलेल्यांचे नाहीत. सत्तेत बसलेले मालक नाहीयेत. जनतेच्या पैशांचा हिशोब द्यावा लागेल, असा थेट जाब काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विचारला. तर याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आक्रमक होत हे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र लुटण्याचे काम करत असल्याचा आरोपही केला.




