शिंदे सेना महापालिकेत ठरणार ‘किंगमेकर’
प्रिती बंड यांनी व्यक्त केला विश्वास

* दिग्गज नेत्यांचा प्रचाराने उमेदवारांना बळ
अमरावती/ 11 जानेवारी – महानगर पालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय गटबाजीत न पडता अतिशय मुत्सद्दीपणे उमेदवारी वाटप करणार्या शिंदे सेनेची भूमिका ’किंगमेकर’ ची ठरणार असून आमच्या पाठिंब्याशिवाय कोणालाही महापालिकेत सत्तेचे स्वप्न पाहता येणार नाही, असा ठाम विश्वास पक्षाच्या महिला नेत्या प्रीती बंड यांनी आपली मातृभूमिशी संवाद साधतांना व्यक्त केला आहे.
पारदर्शक कारभार आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदारांचा शिंदे सेनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता 87 सदस्य असलेल्या सभागृहात आमच्या पक्षाचे संख्याबळ निर्णायक ठरेल, असा दावाही त्यांनी केला आहे. प्रस्थापित पक्षांमधील अंतर्गत कलह आणि तिकीट वाटपावरून झालेला गोंधळ या पार्श्वभूमीवर, शिंदे सेनेने 67 जागांवर आपले स्वतंत्र उमेदवार उभे करून आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे भाजपसोबत युती न झाल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देता आली, हीच पक्षासाठी जमेची बाजू ठरली आहे असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या माध्यमातून अमरावतीचा कायापालट करण्याचा संकल्प प्रीती बंड यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, संजय राठोड, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्या सभांमुळे शहरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता आणि जिल्हाप्रमुख संतोष बद्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते एकवटले आहेत. सत्तेसाठी इतर पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे मतदार संभ्रमात आहेत. त्याचे चोख उत्तर येत्या 15 जानेवारीला मतपेटीतून मिळेल. जर कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर समान विचारधारा असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करण्याचे पर्याय खुले असून, सत्तेच्या केंद्रस्थानी शिंदे सेनाच असेल, असा विश्वास प्रिती बंड यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केला आहे.
गुप्ता पूर्ण ताकदीने प्रचारात सहभागी
माजी मंत्री जगदीश गुप्ता याची पक्षात कोंडी होत असल्याचे कारण पुढे करुन राजीनामा दिला होता. काही दिवसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरसमज दूर केल्यानंतर पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. याकडे लक्ष वेधले असता प्रिती बंड यांनी सांगितले की, माजी मंत्री जगदीश गुप्ता हे पक्षात वरिष्ठ नेते असून त्यांचे विचार हिंदूत्वाशी जुळलेले आहेत. त्यांचा पक्षात योग्य सन्मान राखण्यात येतो. त्यांचा गैरसमज दुर झाल्यामूळे सध्या ते एकदिलाने प्रचारात महत्वाची भूमिका बजावत आहेत.




