पोलिस चौकी निर्मितीला अखेर गृहविभागाने दिली मान्यता

वरूड मोर्शी मतदार संघात तीन

* आ.उमेश यावलकर यांच्या पाठपुराव्याला यश !

वरूड /30 सटेंबर – वरूड व मोर्शी तालुक्यातील पोलिस स्टेशन हद्दीतील गावांची संख्या पाहता, त्या भागातील वाढती लोकसंख्या व भौगोलिक अडचणी लक्षात घेता, तसेच वाढती गुन्हेगारी, दिवसेंदिवस फोफावत असलेले अवैध धंदे आणि महिला अत्याचाराचे प्रमाण यावर कायदेशीर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच पोलिस यंत्रणेला दिवसेंदिवस येणारा वाढता ताण लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरूड-मोर्शी मतदार संघाचे आमदार चंदु उर्फ उमेश यावलकर यांनी आमदार झाल्यापासून गृह मंत्रालयाकडे अतिरिक्त पोलिस चौकीच्या निर्मितीसाठी सतत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील हिवरखेड, वरूड पोलिस स्टेशन हद्दीतील राजुरा बाजार आणि शेंदुरजनाघाट पोलिस स्टेशन हद्दीतील पुसला येथे नव्याने पोलिस चौकी उभारण्याकरिता शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना आजपर्यंत दहा ते बारा किलोमीटर अंतर कापून पोलिस स्टेशन गाठावे लागत होते, ते आता अधिक सोयीचे होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आमदार यावलकर यांचे आभार मानले आहेत.

वरूड व मोर्शी या दोन तालुक्यात एकूण पाच पोलिस स्टेशन आहेत, ज्यात मोर्शी, शिरखेड, वरूड, बेनोडा आणि शेंदुरजनाघाट या मुख्यशहरांचा समावेश आहे. परंतु गेल्या किटीक वर्षांपासून मोर्शी पोलिस स्टेशन हद्दीतील हिवरखेड, वरूडमधील राजुरा बाजार आणि शे. घाटमधील पुसला येथील ग्रामस्थांची अतिरिक्त पोलिस चौकीची मागणी धुळखात होती. याबाबत आमदार यावलकर यांना पत्रव्यवहार करण्यात आला. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आमदार यावलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यानंतर गृहविभागाने नव्याने उभारण्यात येणार्‍या तिन्ही पोलिस चौकींसाठी मान्यता दिली. त्यामुळे आमदार यावलकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button