डॉ.पंजाबराव स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांना जाहीर

127 व्या जयंती उत्सवानिमित्त 27 डिसेंबरला होणार सन्मान

* विदर्भातील कर्तबगार शेतकर्‍यांचा पुरस्काराने गौरव
* पत्रकार परिषदेत हर्षवर्धन देशमुख यांची माहिती

अमरावती /12 डिसेंबर – श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 चा भव्य कार्यक्रम 27 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केला असून, यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाबद्दल देण्यात येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी संस्थेच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. पुरस्कार स्वरूपात 5,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि क्षीफळ दिले जाणार आहे. हा पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्खे व भाऊसाहेब देखमूख यांच्या स्मृतीस समर्पित आहे. जयंती उत्सवाचा मुख्य समारंभ श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणार असून, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. पंकज भोयर, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, तसेच विधानपरिषद सदस्य संजय खोडके, सुलभा खोडके, प्रताप अडसड, रणधीर सावरकर व प्रताप जाधव उपस्थित राहणार आहेत. यावर्षी शेतकरी पुरस्कारांचा देखील समावेश आहे. मा. खासदार शरद पवार यांच्या दान निधीतून उत्कृष्ट महिला शेतकर्‍याला शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार आणि केंद्रिय मंत्री मा. ना. नितीन गडकरी यांच्या निधीतून विदर्भातील पुरुष शेतकर्‍याला स्वर्गीय शरद जोशी उत्कृष्ट पुरुष शेतकरी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या दोन्ही पुरस्कार स्वरूपात 1,11,111 रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र दिले जाईल. याशिवाय, डॉ. पंजाबराव देखमूख क्रीडारत्न पुरस्कार हा कुमारी भक्ती गजानन चौधरी या 10 व्या वर्गातील विद्यार्थिनीला क्रिडा क्षेत्रातील उल्लेखनीय प्रावीण्याबद्दल प्रदान करण्यात येईल. जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने 18 ते 27 डिसेंबर दरम्यान नि:शुल्क कृत्रिम अंगारोपन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात 25 डिसेंबर रोजी आंबा परिषद 2025 आयोजित केली जाईल, ज्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री ना. दत्तात्रे हरणे यांच्या हस्ते होईल. या परिषदेत कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरु डॉ. शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पहिली शाळा शिवाजी हायस्कूल मेन ब्रांच, अमरावती यावर्षी शताब्दी महोत्सव साजरा करत असून, याचे उद्घाटन 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता होईल. यानंतर, 23, 24 आणि 25 डिसेंबर दरम्यान डॉ. पंजाबराव स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर चर्चासत्रे घेतली जातील.
पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, अ‍ॅडव्होकेट गजाननराव पुंडकर, अ‍ॅडव्होकेट जे. व्ही. पाटील पूसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, प्रा. सुभाषराव बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे, स्वीकृत सदस्य डॉ. अंबादास कुलट, विजय ठोकळ, डॉ. पी. एस. वायाळ व डॉ. अमोल महल्ले उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीला सन्मान देणे हा उद्देश नाही, तर शैक्षणिक, सामाजिक, कृषी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यांना उजळणी देणे हेदेखील मुख्य उद्दिष्ट आहे. जयंती उत्सव संपूर्ण अमरावतीसाठी प्रेरणादायी व ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button