जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजणार
मुख्यमंत्री फडणवीस 13 ऑक्टोबरला अमरावतीला दौर्यावर

* मेघे कॉलेजमध्ये भाजपच्या विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा
* पाचही जिल्ह्यांतील भाजप नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित
अमरावती /10 ऑक्टोबर : येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी अमरावती दौर्यावर येत आहेत. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:30 वाजता विशेष विमानाने अमरावती विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट बडनेराजवळील प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. या पार्श्वभूमीवर मेघे कॉलेजच्या सभागृहात भाजपची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला अमरावतीसह यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्व भाजप नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करतील. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच विभागातील चार जिल्ह्यांतील 500 हून अधिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता मेघे कॉलेज परिसरात दाखल होतील. त्यांच्या स्वागतानंतर ते दुपारी 1 वाजेपर्यंत बैठकीला उपस्थित राहतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील. या चार तासांच्या दौर्यादरम्यान शिक्षक मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होईल.या विभागीय बैठकीत पश्चिम विदर्भातील 500 हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार असून, पक्षाने सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्यासह सर्व विद्यमान आणि माजी भाजप खासदार, आमदार, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा आणि विचारविनिमय केला जाणार असून, भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीचा मुख्य अजेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चा करणे हा आहे. मुख्यमंत्री फडणवीस प्रामुख्याने ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांवर चर्चा करतील.




