मोसीकॉलच्या जमिनीचा लिलाव पुन्हा रखडला
तांत्रिक गोंधळामुळे खरेदीदारांचे स्वप्न लांबणीवर

* धार्मिक स्थळांच्या पेचामुळे प्रशासनाची मोठी अडचण
अमरावती /19 जानेवारी – स्थानिक विलास नगर भागातील गेल्या वीस वर्षांपासून बंद पडलेल्या ‘मोसीकॉल’ कारखान्याची पंचवीस एकर जमीन विकण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांच्या जाळ्यात अडकली आहे. तांत्रिक बोलीचा तपशील संगणकीय प्रणालीवर वेळेत न आल्याने आज सोमवारी मिळणारे अधिकृत संमती पत्र थांबले असून, आता सर्वांच्या नजरा पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. दहापैकी सहा कंपन्या या प्रक्रियेत पात्र ठरल्या असल्या तरी, जमिनीवरील मंदिर, दर्गा आणि वन विभागाच्या परवानग्यांचा तिढा सुटेपर्यंत ही प्रक्रिया मार्गी लागणे कठीण दिसत आहे. अमरावती येथील महाराष्ट्र राज्य तेलबिया वाणिज्य आणि औद्योगिक महामंडळ म्हणजेच मोसीकॉलच्या जमिनीचा लिलाव हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात या जमिनीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत दहा बड्या इच्छुकांनी या मौल्यवान जागेत रस दाखवला होता. या प्रक्रियेत तांत्रिक छाननी केल्यानंतर सहा कंपन्यांना अंतिम बोलीसाठी पात्र ठरवण्यात आले होते. नियमानुसार आज या पात्र कंपन्यांना पुढील प्रक्रियेसाठी पत्र मिळणे अपेक्षित होते, पण ऐनवेळी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. या लिलावात अमरावतीसह पुणे आणि मुंबईतील नामवंत उद्योजक रिंगणात आहेत. यामध्ये पुणे येथील ऋचा समूहाचे मनीष बांदेवार, औद्योगिक मालमत्ता लिलाव सेवेचे सौरभ एडाऊ, श्री गणेश सॉफ्ट लिंकचे प्रकाश तनवानी, एमडी ट्रान्सकॉनचे संदीप पाटील, अक्षय इन्फ्राचे हार्दिक, तसेच अमरावतीचे स्थानिक उद्योजक कैलाश अग्रवाल, तापडिया सिटी सेंटरचे मधुर लड्ढा, अजय गौड, सौरभ पनपालिया आणि पुणे येथील केदार जोशी यांनी सहभाग घेतला होता. या दहा नावांपैकी सहा जणांची निवड झाली असून आता त्यांच्यात खरी चढाओढ पाहायला मिळणार आहे. मात्र, हा लिलाव केवळ तांत्रिक कारणामुळेच नाही तर जमिनीवरील काही संवेदनशील विषयामुळेही चर्चेत आहे. मोसीकॉलने ही जमीन ‘आहे त्या स्थितीत’ विकण्याचे जाहीर केले असले तरी, या जागेवर एक मंदिर आणि दर्गा आहे. तसेच वन विभागाच्या काही तांत्रिक परवानग्या आणि जमिनीवरील अतिक्रमण हा देखील मोठा अडथळा ठरत आहे. भविष्यात कोणताही सामाजिक किंवा धार्मिक वाद होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत हा अहवाल येत नाही आणि तांत्रिक अडथळे दूर होत नाहीत, तोपर्यंत ही करोडोंची लिलाव प्रक्रिया थंड बस्त्यात राहण्याची शक्यता आहे. यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सज्ज असलेल्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा आता आणखी वाढली आहे.
मैदानात असलेल्या दहा प्रमुख दावेदारांची नावे- मोसीकॉलच्या लिलावात मनीष बांदेवार, सौरभ एडाऊ, प्रकाश तनवानी, संदीप पाटील, हार्दिक, कैलाश अग्रवाल, मधुर लड्ढा, अजय गौड, सौरभ पनपालिया आणि केदार जोशी या दहा जणांनी निविदा भरल्या होत्या. तांत्रिक तपासणीनंतर यातील सहा जण पात्र ठरले असून सर्वाधिक बोली लावणार्याला ही जमीन मिळणार आहे.




