राज्यस्तरीय स्पर्धेत वसुधाताई देशमुख महाविद्यालय बोडणाचे सुयश
संस्थाध्यक्ष, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

अमरावती/ 18 जानेवारी– महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे 16 वी राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्सव 2025-2026 नुकताच उत्साहात पार पडला. शाश्वत विकासासाठी आजचा युवक या संकल्पनेवर आधारित या स्पर्धा उत्सवात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय स्पर्धा उत्सवात उत्कर्ष साधत श्रम साफल्य फाउंडेशन द्वारा संचालित सौ. वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय, बोडना, अमरावती येथील विद्यार्थी सुहानी गोदे, अशी गंधे, वैष्णवी राऊत, इशा सिदाम, ऋतुजा धोत्रे, अथर्व निचडे, दुर्गेश पडोळे, लीलाधर काळे व वेदांत इंगोले यांची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला विद्यापीठ संघामध्ये निवड झाली आहे.या स्पर्धा उत्सवात भारतीय लोककला, भारतीय लोकनृत्य, समूहगीत, एकांकिका नाट्य, कविता, पथनाट्य, निबंध, छायाचित्र, चित्रकला, वक्तृत्व, पोस्टर मेकिंग, फ्लेक्स बॅनर तसेच सेकंड रील्स अशा विविध सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः फ्लेक्स बॅनर या स्पर्धेत सौ. वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी दुर्गेश पडोळे याने द्वितीय पुरस्कार पटकावून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला. या निवडी व यशाबद्दल श्रम साफल्य फाउंडेशन व कृषी महाविद्यालयाच्या संचालिका माजी राज्यमंत्री मा. वसुधाताई देशमुख, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. संदीप हाडोळे (संचालक, विद्यार्थी कल्याण तथा समन्वयक), डॉ. मंजुषा देशमुख (विद्यार्थी विकास अधिकारी) तसेच सौ. वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय बोडणा चे प्राचार्य डॉ. संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यापीठातर्फे संघ प्रमुख सहा. प्रा. स्वाती देशमुख (विद्यापीठ संघप्रमुख) यांचे मार्गदर्शन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लाभले. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.




