4 जूनपासून कर्मचार्यांचा राज्यव्यापी संप
जळगाव बैठकीत आंदोलनाचा आक्रमक निर्णय

* प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचार्यांचा एल्गार
अमरावती/28 एप्रिल: राज्यातील अकृषी विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून 4 जूनपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. जळगावात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यभर टप्प्याटप्प्याने आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही निर्णायक बैठक पार पडली. यावेळी मिलींद भोसले, रामसाहेब त्रिभूवन, ज्ञानेश्वर दाखोरे, संदीप हिवरकर, सतीश वाघमारे आणि जळगाव विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे सचिव अरुण सपकाळे उपस्थित होते. देशमुख यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांचा आढावा घेत राज्यभरातील कर्मचार्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. आंदोलनाची सुरुवात 4 मे रोजी उच्च शिक्षण संचालकांना निवेदन देऊन होईल. 14 ते 16 मे काळ्या फिती लावून निषेध, 17 ते 19 मे दरम्यान दुपारी दोन ते तीन या वेळेत घोषणाबाजी, 21 मे रोजी लेखणी बंद, 25 मे ला स्थानिक कार्यालयांसमोर लाक्षणिक आंदोलन आणि 28 मे रोजी एकदिवसीय संप पुकारला जाणार आहे. या सर्व टप्प्यांनंतरही सरकारने दखल न घेतल्यास 4 जूनपासून कर्मचारी बेमुदत संपावर जातील. कर्मचार्यांच्या या पवित्र्यामुळे शिक्षण संस्थांमधील दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होणार असून, सरकार आता कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, 58 वरून 60 वर्षे सेवानिवृत्ती वय, 10-20-30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना, रिक्त पदे भरणे, 5 दिवसांचा आठवडा आणि कर्मचार्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हा संघर्ष पुकारला आहे.




