पोलीस निरीक्षकासह आठ कर्मचार्‍यांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल

पोलीस कस्टडीतील युवकाच्या मृत्यू प्रकरणी

चांदूर रेल्वे/2 नोव्हेंबर : न्यायालयाच्या अटक वॉरंटनुसार अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीत युवकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल 16 महिन्यानंतर पोलिसांनी चांदूररेल्वेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरराव यांच्यासह आठ पोलीस कर्मचार्‍यांविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने खुनाचा गुन्हा दाखल केला. याकारवाईने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक अजय अहिरराव, पोलीस अंमलदार राजकुमार जैन, विशाल रंगारी, अश्विनी आखरे, सरीता वैद्य, प्रवीण मेश्राम, अलिम गवळी, अमोेल घोडे, प्रशांत ढोके व इतर अनोळखी पोलीस कर्मचारी यांच्याविरूध्द न्यायालयाच्या आदेशान्वये फ्रेजरपुरा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनेच्यावेळी चांदूररेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. चांदूररेल्वे शहरा तील मिलिंद नगर येथील नितेश अशोक राव मेश्राम (वय 30) याचा 13 जून 2024 रोजी मृत्यू झाला. चांदूररेल्वे पोलिसानी 10 जूनच्या रात्री 12 वाजताच्या सुम ारास नितेशला त्याच्या घरून अटक केली होती. त्याच्याविरोधात न्यायालयाचा पकड वॉरंट असल्याचे त्याच्या अटकेचे कारण सांगण्यात आले होते. चांदूररेल्वे ग्रामीण रूग्णालयात त्याची तपासणी करून चांदूररेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली होती. दुसर्‍या दिवशी त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथून त्याची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. परंतु त्याची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे पाहून कारागृह प्रशासनाने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले होते. 13 जून 2024 रोजी नितेश मेश्राम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याच्या अंगावर 16 जखमा असल्याचे निष्पन्न झाले. 11 ते 13 जून याकालावधित पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष मारहाणीत नितेश मेश्रामचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता. याप्रकरणात दोषी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांविरूध्द कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा मृताची आई व कुटूंबाने दिला होता. दरम्यान 16 महिन्यानंतर याप्रकरणात न्यायालयाने चांदूररेल्वेच्या संबंधित पोलीस अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसानी चांदूररेल्वेचे तत्कालीन ठाणेदार अजय अहिरराव यांच्यासह आठ पोलीस कर्मचार्‍यांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे प्रकरण चांदूररेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button