मेळघाटात उन्हामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू

धारणी व चिखलदर्‍यात उष्णतेचा वाढला कहर

* मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही

अमरावती/30 एप्रिल- जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानाचा पारा 46 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे भीषण उन्हाची लाट निर्माण झाली आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका बेघर नागरिकांना बसत असून मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून त्याचा थेट परिणाम बेघर नागरिकांवर होत आहे. धारणी तालुक्यातील धानू नाल्याच्या जंगलात 35 ते 40 वयोगटातील एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. दुर्गंधी पसरल्यामुळे परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाली. ही महिला आजूबाजूच्या गावात भीक मागत फिरत होती आणि एका आठवड्यापूर्वी तिला गावकर्‍यांनी पाहिले होते. बेवारस महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांनी वाढत्या तापमानामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे, अशी माहिती धारणीचे पोलीस ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांनी दिली. याचप्रमाणे चिखलदरा तालुक्यातील कामलापूर परिसरातील जंगलात असलेल्या नानू नाल्यात 40 ते 45 वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चिखलदरा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कामलापूर परिसरातील जंगलात सापडलेल्या या मृत व्यक्तीची ओळख अजूनही पटू शकलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

उष्माघाताच्या रुग्णांसाठी केली स्वतंत्र व्यवस्था

जिल्हा रुग्णालयासह प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील उपचाराचे नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र, दुर्गम भागात अशी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत पोहोचवणे आव्हानात्मक ठरते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक विनोद पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button