दवाखान्याच्या पाण्याच्या टाकीत कुजलेला मृतदेह आढळला
पठाण चौकातील दवाखान्यातील घटना

परीसरातील लोकांना दुर्गंधीमुळे सुगावा
अमरावती/13 मे- शहरातील पठाण चौक परिसर बुधवारी सकाळी भीती आणि खळबळीत बुडाला. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या दवाखान्याच्या छतावरील पाण्याच्या टाकीत कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. परिसरात अचानक पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी कुलूप तोडून तपास सुरू केला असता टाकीचे झाकण उघडताच आत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला आणि उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला. मृतदेह इतका विद्रूप झाला होता की सुरुवातीला तो पुरुषाचा की महिलेचा हेही स्पष्ट होत नव्हते. नागपुरी गेट पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पठाण चौक परिसरातील समाजसेवक डॉ. वजीर पटेल यांच्या संस्थेशी संबंधित दवाखाना अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. इमारतीच्या छतावर दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळपासून परिसरात असह्य दुर्गंधी पसरू लागल्याने नागरिकांना संशय आला. सुरुवातीला एखादे जनावर मृत पडले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र दुर्गंधी वाढत गेल्याने नागरिकांनी परिसरातील नगरसेवक राशीद अली आणि सामाजिक कार्यकर्ते वाहिद खान यांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीत बंद दवाखान्याचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर छतावरील टाक्यांची पाहणी सुरू असताना एका टाकीचे झाकण उघडताच आत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण असल्याने काही जण घाबरून मागे सरकले. त्यानंतर पोलिसांनी परिसर ताब्यात घेत फॉरेन्सिक पथकाला बोलाविले. मृतदेह अनेक दिवसांपासून पाण्यात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शरीर पूर्णपणे कुजल्यामुळे ओळख पटविणे कठीण बनले आहे. मृतदेहाजवळ कोणतेही ओळखपत्र अथवा वस्तू आढळून आली नाही. प्राथमिक तपासात हा मृतदेह पुरुषाचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बंद दवाखान्याच्या छतावर संबंधित व्यक्ती कशी पोहोचली, हा अपघात आहे की आत्महत्या अथवा घातपात याबाबत परिसरात चर्चा रंगल्या आहेत. मृतदेह टाकीत कसा गेला आणि इतके दिवस कोणालाही याची कल्पना कशी आली नाही याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. दवाखाना बंद असल्याने तेथे संशयितांची वर्दळ असण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली. घटनेनंतर पठाण चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. नागपुरी गेट पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
टाकीतील दुर्गंधीने फोडले गूढ-पठाण चौक परिसरात सकाळपासून तीव्र दुर्गंधी पसरत होती. नागरिकांनी संशय घेत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बंद दवाखान्याचे कुलूप तोडले. छतावरील पाण्याच्या टाकीत कुजलेला मृतदेह आढळताच परिसरात भीती आणि खळबळ उडाली.




