अमरावतीच्या सहकार क्षेत्रात निवडणुकीचा धमाका

धन्वंतरी रुग्णालय आणि जिल्हा पतसंस्थेचा बिगुल वाजले

* सहकार प्राधिकरणाकडून दोन दिवसांत रणधुमाळीची घोषणा

अमरावती/27 फेब्रुवारी – जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दोन अत्यंत महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुकांचे ढोल वाजले असून सत्तासंघर्षाची पहिली ठिणगी पडली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ’ब’ श्रेणीत मोडणार्‍या धन्वंतरी सहकारी रुग्णालय आणि अमरावती जिल्हा सहकारी पतसंस्था या दोन मोठ्या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले असून, येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते. अशातच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ’ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे फर्मान काढले आहे. या आदेशाची प्रत मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाली. या नव्या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या धन्वंतरी सहकारी रुग्णालय आणि अमरावती जिल्हा सहकारी पतसंस्थेच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी सुमेध पाटील यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, जिल्ह्यातील ’ब’ श्रेणीतील या दोन महत्त्वाच्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. या दोन्ही संस्थांची अंतिम मतदार यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली असून, आता केवळ प्रत्यक्ष वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियमावलीच्या अधीन राहून या निवडणुकीचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा मंजुरीसाठी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवला जाईल आणि त्यानंतर पुढील 48 तासांत तो सार्वजनिक केला जाईल. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा कणा असलेले धन्वंतरी रुग्णालय आणि आर्थिक नाड्या हाती असलेली जिल्हा सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे चिन्ह आहे. या संस्थांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी आणि सहकार धुरिणांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. लवकरच अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि मतदानाची तारीख स्पष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आता कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.
प्रशासनाची तयारी पूर्ण-जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला निवडणुकीचे आदेश प्राप्त होताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. सुमेध पाटील यांनी स्पष्ट केल्यानुसार, धन्वंतरी रुग्णालय व जिल्हा पतसंस्थेच्या मतदारांची अंतिम यादी तयार असून, निवडणूक नियमावलीनुसार पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल. पुढील दोन दिवसांत उमेदवारी अर्ज आणि मतदानाचे चित्र स्पष्ट होईल.

Back to top button