शिरखेड येथे कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

राहत्या घरातच घेतला गळफास

मोर्शी / 27 जुलै : मोर्शी येथून जवळच असलेल्या शिरखेड येथील एका 45 वर्षीय अल्पभूधारक शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी, 26 जुलै रोजी उघडकीस आली. संजय पांडुरंग भुजाडे असे आतमहत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.
संजय भुजाडे यांच्याकडे शिरखेड शेत शिवारात दीड एकर शेती असून सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात होते. अशातच त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही वाढला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. म्हणून त्यांनी दीड एकर पैकी अर्धा एकर शेती विकून टाकली. उर्वरित एक एकर शेतामध्ये पेरणी करण्यासाठी त्यांनी स्टेट बँकेच्या लेहगाव शाखेतून दीड लाखाचे कर्ज घेतले होते. तसेच दोन मुलींच्या शिक्षणासाठी बचत गट व मायक्रो फायनान्ससारख्या खाजगी कंपनीकडून सुद्धा कर्जाची उचल केली होती. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीन, कपाशीची पेरणी केली. मात्र वेळी-अवेळी पडलेल्या पावसामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.
दुबार पेरणीनंतरही निसर्ग त्यांच्यावर कोपला. मुसळधार पावसात शेतीतील पीक खरडून गेले. अशात कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते सापडले. अशातच संजय भुजाडे यांनी टोकाचे पाउल उचलून आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. शनिवारी, पत्नी व मुली या दवाखान्याच्या कामासाठी मोर्शी येथे गेल्या होत्या. घरात एकटेच असताना संजय भुजाडे यांनी टीनाच्या अँगलला नायलॉन दोरीचा गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर शिरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आज दुपारी शिरखेड येथे अंत्य संस्कार पार पडले.

संबंधित बातम्या

Back to top button