पाच वर्षानंतर अमरावतीत आढळला कोविड संक्रमित रुग्ण

54 वर्षीय महिलेला लागन

-सौम्य लक्षण, घरीच विलगीकरण
-आरोग्य विभागात खळबळ
अमरावती / 30 मे: कोविडच्या कठिण काळातील आठवणी आत्ताकुठे अमरावतीकरांच्या स्मरणातून धूसर होत असतानाच तब्बल पाच वर्षांनंतर शहरात पून्हा कोविड संक्रमिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. एका 54 वर्षीय महिलेचा कोविड तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला कोविडची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाची लागन झालेल्या महिलेला त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर महिला काही दिवसांपूर्वीच बाहेरगावाहून अमरावतीत आपल्या घरी परतली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या तपासणीसाठी दवाखान्यात गेल्या असता कोविडची लक्षणे आढळून आल्याने डॉक्टरांनी त्यांना कोविड तपासणी करण्यास सांगितली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या महिलेला कोविडची लागन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरु असून सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ही महिला स्थानिक मंगलधाम कॉलनीतील रहिवासी आहे. नातेवाईकाकडील विवाह संमारंभातून घरी परतल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली. तीन दिवस उपचार घेतल्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी कोविड तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या कोविड तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचल्या. मात्र तेथे कोविड तपासणीची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कोविड प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या महिलेने चार दिवसांपूर्वी विद्यापीठातील प्रयोगशाळेत दिलेल्या रक्ताच्या नमून्यांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यात महिला कोविड संक्रमित असल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. महिला राहत असलेल्या परिसरात याबाबत माहिती पोहोचताच तेथेही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौदळे यांनी सांगितले की, महिलेमध्ये कोविडची अत्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे महिलेला त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना सतर्कता बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत या महिलेसह शहरातील आणखी एका व्यक्तीने कोविड टेस्ट केली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

-इर्विनमध्ये 10 खाटांची स्वतंत्र व्यवस्था
महाराष्ट्रात आणि देशाच्या काही भागात कोविडचा प्रकोप पून्हा आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. अमरावती जिल्हा आरोग्य विभागही काळजी घेत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आपातकालिन स्थितीत कोविड रुग्णांसाठी 10 खाटांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून मूबलक प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली. जर एखाद्या रुग्णामध्ये कोविडची तीव्र लक्षणे आढळून आली तर त्याला याच कक्षात विलगीकरणात ठेवण्यात येईल आणि त्याच्यावर याच कक्षात उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button