छत्री तलाव परिसराचा होणार पर्यावरणपूरक विकास
मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचे निर्देश

-सुरक्षेला प्राधान्य देण्याची सूचना
-अधिकार्यांसमवेत केली पाहणी
अमरावती / 2 जुलै: अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज सकाळी छत्री तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करण्यासोबतच येथे नागरीकांना सुरक्षा प्रदान करण्यावर भर देण्यात यावा, अस निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले. तसेच छत्री तलावा परिसर अधिक आकर्षक व्हावा यादृष्टीने परिसराचे सौंदर्यिकरण करण्याच्या सूचनाही सौम्या शर्मा यांनी केली.
छत्री तलाव परिसरात सध्या पाथवे, घाट, स्वच्छतागृह, फूड कोर्ट, टिकीट घर, गझीबो, ओपन जिम, किड्स प्ले एरिया, प्रवेशद्वार, कंपाऊंड वॉल आणि सुसज्ज पार्किंग सुविधा उभारण्यात आलेली आहे. आयुक्तांनी या परिसरात कठडे बसविणे, आकर्षक पथदिवे लावणे आणि हायमास्ट लाईट कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले. स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देत त्यांनी परिसरात डस्टबिन्स ठेवण्यास सांगितले आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आदेश दिले. छत्री तलाव परिसर ‘प्लास्टिक प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
हा परिसर निसर्गरम्य असून पर्यावरणाला अनुसरून विकास करणे अत्यावश्यक आहे. अमरावतीचे हे एक प्रमुख वैभव आहे आणि ते जपणे आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी यावेळी केले. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, विधी अधिकारी श्रीकांतसिंह चौहान, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, उपअभियंता प्रमोद इंगोले, शरद तिनखेडे, अभियंता आनंद जोशी, देशपांडे, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक कुंदन हडाले तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते.




