गोपाल राणे आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

-शेतीच्या वादातून प्रताडणा
-जिवे मारण्याच्या धमक्या
-राणेंच्या जमीनीवर अतिक्रमनही केले होते
अमरावती / 20 जून: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि शिवसैनिक गोपाल राणे यांनी गुरुवारी आपल्या राठी नगर स्थित निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येमागील कारण त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून स्पष्ट झाले असून शेतीच्या वादातून त्यांच्याच गावातील काही लोकांकडून दिल्या जात असलेल्या धमक्यांमुळे गोपाल राणे यांनी हे आत्मघाती पाउल उचलल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी चार जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.
बाबूराव राजेराम राउत (62), बाबाराव धनाजी बरडे (60), सुदर्शन अंबादास किटुकले (55) आणि धनराज अंबादास किटुकले (50, सर्व रा. देवरा-देवरी, चांदुर बाजार) अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल राणे हे चांदुर बाजार तालुक्यातील देवरा-देवरी या गावातील मुळ रहिवासी असून तेथे त्यांची शेतजमीन आहे. या जमीनीवर आरोपींनी अतिक्रमन केले होते. त्यामुळे गोपाल राणे यांचा आरोपींसोबत वाद सुरु होता. त्यातून आरोपींकडून गोपाल राणे यांना सतत मानसिकदृष्ट्या प्रताडित केले जात होते. त्यांना रस्त्यात गाठून आरोपींकडून जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली जात होती. या प्रकारामुळे गोपाल राणे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होते.
गुरुवारी सकाळी पत्नीसोबत मॉर्निंग वॉकहून गोपाल राणे आपल्या राठी नगर स्थित निवासस्थानी परतले. घरी आल्यानंतर ते थेट आपल्या खोलीत गेले आणि तेथे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपाल राणे यांनी एक पत्र लिहून ठेवले होते. ते पोलिसांनी हस्तगत केले होते. त्यात शेतीच्या वादाचा उल्लेख करुन गोपाल राणे यांनी स्वत:च्या आत्महत्येसाठी त्यांच्या गावातील बाबूराव राजेराम राउत, बाबाराव धनाजी बरडे, सुदर्शन अंबादास किटुकले आणि धनराज अंबादास किटुकले यांना जबाबदार धरले होते. गाडगेनगर पोलिसांनी या सुसाईड नोटच्या आधारे आणि गोपाल राणे यांचा मुलगा ओमप्रकाश राणे यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button