भानखेडा-हनुमानगढी रस्त्यावर दगडाने ठेचून निर्घृण हत्या
चंद्रपूरचा प्रमोद भलावी ठरला रक्तरंजित खुनाचा बळी

अमरावती / 13 नोव्हेंबर : भानखेडा-हनुमानगढी रस्त्यालगतच्या जंगल परिसरात बुधवारी सायंकाळी एका इसमाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. चेहर्यावर मोठ्या दगडाने ठेच देऊन हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीची ओळख प्रमोद भलावी (वय 42, रा. कारला, जि. चंद्रपूर) अशी पटली आहे. तो गेल्या महिन्याभरापासून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी येथील सासरी राहत होता. सोमवारपासून प्रमोद बेपत्ता होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काही मेंढपाळ आपल्या जनावरांना घेऊन परत येत असताना जंगलाच्या कडेला झाडाखाली त्यांना मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ बडनेरा पोलिसांना माहिती दिली. सूचना मिळताच बडनेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त कैलाश पुंडकर, तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, प्रमोदच्या चेहर्यावर मोठ्या दगडाने ठेच देऊन हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळी दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास आणि एम.एच. 27 ए.झेड. 1875 क्रमांकाची मोटरसायकल आढळली आहे. या पुराव्यांवरून प्रमोद आणि त्याच्या ओळखीच्या व्यक्तीमध्ये मद्यपानादरम्यान वाद झाल्यानेच खून घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेहाची स्थिती पाहता, हत्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच सोमवारी रात्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रमोदचा खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असावा. पोलिसांनी काही संशयितांवर लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास जलदगतीने सुरू आहे. आरोपी पोलिसांच्या निकट असल्याची माहिती मिळाली असून, लवकरच या रक्तरंजित हत्येचे गूढ उकलले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनास्थळी रक्ताचे ठसे, दारूच्या बाटल्या आणि मोटरसायकल आढळली
ज्या झाडाखाली प्रमोद भलावीचा मृतदेह आढळला, त्याच ठिकाणी रक्ताचे ठसे, मोठे दगड, दारूच्या बाटल्या आणि रिकामे ग्लास सापडले. मृतदेहाशेजारीच त्याची मोटरसायकल उभी होती. पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून हा खून अत्यंत जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.




