आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार
बंगालमध्ये ममतादीदींचा गड अभेद्य

तामिळनाडूत द्रमुकचा डंका
विविध एक्सीट पोलचे अंदाज जाहीर
नवी दिल्ली/29 एप्रिल- देशातील केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आता काहीच दिवसांत मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. परंतु, तत्पूर्वी एक्झिट पोलचे कल हाती आले असून, आसाममधील जनता पुन्हा एकदा भाजपाच्याच पाठीशी राहणार असल्याचे दिसत आहे. तर काँग्रेसचा वनवास संपण्याची चिन्हे नसून, चांगल्या विजयासाठी काँग्रेसला अद्यापही प्रतिक्षा करावी लागू शकते, असे चित्र आहे.
आसाममधील 126 जागांसाठी एकूण 722 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये भाजपाने सर्वाधिक 90 उमेदवार, त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद (एजेपी) 26 जागांवर आणि बीपीएफ 11 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने आसाममधील 99 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर त्यांच्या मित्रपक्षांमध्ये रायजोर दल 13 जागांवर आणि आसाम जातीय परिषद 10 जागांवर उमेदवार उभे आहेत. सीपीआय (एमएल) दोन जागांवर, सीपीएम दोन जागांवर आणि एपीएलसी दोन जागांवर निवडणूक लढवत आहे. बदरुद्दीन अजमल यांच्या पक्षाने 27 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर टीएमसी 23 जागांवर निवडणूक लढवत आहे. जेएमएम 19 जागांवर निवडणूक लढवत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याविरोधात काँग्रेसने गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली होती. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला 88 ते 100 जागा, तर काँग्रेसला 24 ते 36 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, एनडीए आसाममध्ये प्रचंड बहुमताने सत्तेची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत दिसत आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी विजयी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपाला 48 टक्के, काँग्रेसला 38 टक्के तर इतरांना 14 टक्के मते मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. पीपल्स पल्सनुसार, भाजपाला 68 ते 72, काँग्रेस 22 ते 26 आणि अन्य 07 ते 15 जागांवर विजयी होऊ शकतात. पोल डायरीनुसार, भाजपाला 86 ते 101 जागा, काँग्रेसला 15 ते 26 जागा आणि इतर/अपक्षांना 03 ते 07 जागा मिळू शकतात, असा कयास आहे. दरम्यान, पोल ऑफ एक्झिट पोलच्या दाव्यांनुसार, भाजपाला 88 जागा, काँग्रेसला 27 जागा मिळू शकतात. तर अन्य/अपक्ष 6 जागांवर विजयी होऊ शकतात. जेव्हीसीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाला 88 ते 101, काँग्रेसला 23 ते 33 आणि इतर 2 ते 5 जागांवर विजयी होऊ शकतात. पी-मार्कानुसार, भाजपा 82 ते 94, काँग्रेस 30 ते 40 आणि इतरांना 1 ते जागा मिळू शकतात. मॅक्ट्रिझनुसार, भाजपा 85 ते 95 जागा, काँग्रेस 25 ते 32 जागा, इतर 06 ते 12 जागांवर विजयी होऊ शकतात. जवळपास सर्वच एक्झिट पोलनी भाजपाच्याच बाजूला जनतेला कौल असल्याचा कल दाखवला आहे.
पश्चिम बंगाल : ममता दीदी ?
बंगालमध्ये एक्झिट पोलच्या निकालांमध्ये मोठी तफावत आहे, ज्यामुळे निकालाचा सस्पेन्स वाढला आहे. ’पीपुल्स पल्स’ने तृणमूलला 177 ते 187 जागांसह बहुमताचा अंदाज दिला आहे. तर ’प्रजा पोल’ने भाजपला 177 जागा, तर ’मॅट्रिझ’ने 146 ते 161 जागा मिळतील असा दावा केला आहे. पी-मार्क या एजन्सीने भाजपला 150 ते 175 आणि टीएमसीला 118 ते 138 जागा मिळतील असे म्हटले आहे. चाणक्य स्ट्रॅटेजिजने देखील भाजपाला कल दिला असून ममतांना 130-140 आणि भाजपाला 150-160 जागा दाखविल्या आहेत.
पाँडीचेरी: एनडीए आघाडीवर
पुडुचेरीमध्ये एनडीए 40% मतांसह आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, 18-29 वयोगटातील 50% पेक्षा जास्त तरुणांनी अभिनेता विजय यांच्या ढतघ+ पक्षाला पसंती दिली आहे, तर 60 वर्षांवरील 52% ज्येष्ठांनी एनडीएला साथ दिली आहे.
केरळ : युडीएफला निसटती आघाडी
वोट वाइब’च्या अंदाजानुसार केरळमध्ये सत्तांतर होऊ शकते. येथे यूडीएफला 70 ते 80 जागा मिळताना दिसत आहेत, तर सत्तेत असलेल्या एलडीएफला 58 ते 68 जागांवर समाधान मानावे लागू शकते.




