विविध रस्ते अपघातात तब्बल 16 जणांचा बळी
अपघातात 18 ते 34 वयोगटातील मृतांचे प्रमाण सर्वाधिक

अमरावती /15 फेब्रुवारी – जिल्ह्यामध्ये रस्ते अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून केवळ 11 दिवसांच्या कालावधीत 28 भीषण अपघात घडले आहेत. या हृदयद्रावक घटनांमध्ये 16 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 32 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी होणारी अतिवेगवान वाहन चालवण्याची स्पर्धा आणि वाहतुकीच्या नियमांचे होणारे उल्लंघन यामुळे जिल्ह्याचे रस्ते मृत्यूचे सापळे बनत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अमरावती शहर आणि ग्रामीण भागात अपघातांचा आलेख वेगाने उंचावत आहे. 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यानच्या आकडेवारीने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. जखमींपैकी 18 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे 90 टक्के अपघात हे रात्रीच्या वेळी घडले असून, वेगावर नियंत्रण नसणे हे त्यामागील मुख्य कारण आहे. ग्रामीण भागातील विविध तालुक्यांमध्ये अपघातांचे हे प्रमाण अधिक असून यामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या तपासणीत मद्यपान करून वाहन चालवणे, विरुद्ध दिशेने गाडी नेणे, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे आणि चुकीच्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणे ही प्रमुख कारणे समोर आली आहेत. वाहतूक विभाग सातत्याने जनजागृती करत असूनही नियमांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती वाढली आहे. दुचाकी चालवताना शिरस्त्राण आणि चारचाकी चालवताना सुरक्षा पट्ट्याचा वापर न करणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. रस्ते सुरक्षा पाळणे ही आता काळाची गरज बनली आहे.




