अमरावतीत उभारणार मायबापांच्या स्मृतीचे साहित्य भवन
मातोश्री स्व.सूर्यकांतदेवी रा. पोटे पाटील पुरस्कार सोहळ्यात प्रवीण पोटे यांची घोषणा

* झाडीबोली महर्षी डॉ.हरिश्चंद्र बोरकर साहित्यव्रती पुरस्काराने सन्मानित
अमरावती/31मार्च -समाजातील सोशिक आणि वंचितांचे दुःख आपल्या लेखणीतून मांडणार्या सारस्वतांचा सन्मान होणे ही काळाची गरज आहे. ही साहित्य चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहचून ती अधिक जोमाने फुलावी, या उदात्त हेतूने माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आपल्या आई-वडिलांच्या पवित्र स्मृती जपण्यासाठी अमरावतीत एक भव्य ’साहित्य भवन’ उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पी. आर. पोटे पाटील शिक्षण समूहाचे संचालक डॉ. पी. एम. खोडके, ज्येष्ठ समीक्षक डॉ. मनोज तायडे आणि संस्थेचे सचिव श्रेयसदादा पोटे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या देखण्या सोहळ्यात झाडीबोलीचे अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना 2025 चा ’साहित्यव्रती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांना 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
साहित्याच्या विविध क्षेत्रात मोलाची भर घालणार्या मान्यवरांचाही यावेळी सन्मान झाला. यामध्ये ’कायांतर’ कादंबरीसाठी नागपूरच्या रश्मी पदवाड मदनकर, ’शीतपेटीतून जेव्हा जाग येते’ कथासंग्रहासाठी ठाण्याचे क्षितीज देसाई, ’उद्याचा दहशतजर्द अंधार’ काव्यसंग्रहासाठी रत्नागिरीच्या कविता मोरवणकर आणि ’येथे आमचाही श्वास कोंडतो’ साठी गडचिरोलीचे प्रभू राजगडकर यांना गौरवण्यात आले. समीक्षा ग्रंथासाठी सोलापूरचे डॉ. शिवाजी शिंदे, संपादनासाठी डॉ. बबन नाखले व अरुण मानकर, तर बालसाहित्यासाठी नवी मुंबईचे मोहन काळे यांना पुरस्कृत केले. शिरजगावचा तरुण कवी नितीन पर्हाड याला ’उभरती प्रतिभा’ पुरस्कार मिळाला. या सर्वांना 3 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील 35 साहित्यिकांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शोभा रोकडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राजक्ता राऊत यांनी केले. संदीप देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. या प्रसंगी परीक्षक विशाल मोहोड, खुशाल गुल्हाने, नीता कचवे, किशोर जर्हाड, दीपक दारव्हेकर आणि डॉ. कुमार बोबडे, डॉ. पंकज वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला.




