गुटखा विकणार्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का
‘हार्म आणि हर्ट’नुसार कायद्यात बदल

* नरहरी झिरवळ यांची माहिती
मुंबई /17 डिसेंबर : राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमल बजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. दरम्यान, राज्यात गुटखा बंदी असतानाही पोलि सांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे, सरकार आता गुटखा विक्री करणार्यांवर थेट मोक्काची कारवाई करणार आहे. गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार हार्म आणि हर्ट या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणार्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल.




