महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार

परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप, उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल

मुंबई/30 मार्च – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत ’साहित्य संवर्धन आघाडी’ने बाजी मारत सत्तेत बदल घडवून आणला होता. योगेश सोमण अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यांना 5 हजार 365 मते मिळाली होती. तर स्वाती महाळंक कार्यवाह, तर प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदी विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या लढतीत सोमण यांनी मिलिंद जोशी यांचा अवघ्या 45 मतांनी पराभव केला होता. दरम्यान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मतमोजणी करताना गैरप्रकार झाल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीनं केला आहे. निवडणूक अधिकार्‍यांनी केलेल्या गैरप्रकाराबाबत परिवर्तन उत्कर्ष आघाडीनं मुंबईच्या उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल करण्यात आला आहे. मतपेटी सील करताना झालेल्या एकूण मतदानाची आकडेवारी अथवा टक्केवारी जाहीर करणे अपेक्षित होते ती दिली गेली नसल्याची तक्रार केली आहे. मिलिंद जोशी आणि योगेश सोमण यांच्यात केवळ 45 मतांचे अंतर आहे. तत्काळ फेरमतमोजणीची लेखी मागणी करूनही निवडणूक अधिकार्‍यांनी ती नाकारली गेली असल्याची तक्रार दाखल केली आहे. निवडणूक अधिकार्‍यांचे हे वर्तन संशयास्पद आहे असे परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या वतीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिट अर्ज ताबडतोब सुनावणीस घेण्यात यावा म्हणून उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिखित विनंती केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगेश सोमण यांनी मिलींद जोशी यांचा पराभव केला होता. तर मुख्य कार्यवाह या महत्त्वाच्या पदांवर देखील स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष पदावर प्रदिप निफाडकर हे साहित्य संवर्धन पॅनेलचे उमेदवार निवडून आले होते. परिवर्तन उत्कर्ष पॅनेलच्या मुख्य कार्यवाह पदाच्या उमेदवार सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला. परिवर्तन उत्कर्ष पॅनेलचे आशुतोष जावडेकर आणि अंजली कुलकर्णी, माधव राजगुरु हे उमेदवार निवडून आले होते. मात्र, साहित्य संवर्धन पॅनेलच्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. पुढील वर्षी होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100 वं साहित्य संमेलन ठरणार आहे. 100 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button