गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला; दोघांचा मृत्यू

12 जण जखमी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुर्घटना

छत्रपती संभाजीनगर/15 सप्टेंबर– गणपती आगमन सोहळ्याच्या उत्साहाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघाताने गालबोट लागले. चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील पिंप्रीराजा गावाच्या वळणावर गणपती आगमनाच्या मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने झालेल्या अपघातात दोन शेतकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले.
कंटेनरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गणपती आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंप्रीराजा गावात मिरवणुकीची तयारी सुरू होती. यासाठी नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. याचवेळी चित्तेपिंपळगाव-करमाड मार्गावरील गावाच्या वळणावर भरधाव वेगाने आलेला कंटेनर अचानक मिरवणुकीत घुसला. कंटेनरने रस्त्यावर असलेल्या दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत काही दुचाकीस्वारांना चिरडत कंटेनर पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत विठ्ठल राममाळ जाधव आणि रमेश लहूजी बनसोडे या दोन शेतकर्‍यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य 12 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Back to top button