काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही
बारामती पोटनिवडणुकीवर बावनकुळेंचा इशारा

* सुनेत्रा पवारांना 75 टक्के मताधिक्य घेणार
पुणे /6 एप्रिल: बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत आक्रमक भूमिका मांडली. बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. जर लढलीच तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा थेट इशारा त्यांनी काँग्रेसला दिला आहे.
बावनकुळे यांनी अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत काँग्रेसला भावनिक साद घातली. अजित दादांचा बहुतांश राजकीय काळ काँग्रेससोबत गेला आहे. त्यांचे संबंध, सहवास आणि कामाचा इतिहास काँग्रेसशी जोडलेला आहे. त्यामुळे काँग्रेसने काही राजकीय संस्कार जपायचे असतील, तर त्यांनी बारामतीत निवडणूक लढवू नये आणि सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहावं, असं ते म्हणाले. बारामतीतील विजयाबाबत त्यांनी मोठा दावा केला. आम्ही स्वतः बारामतीत जाऊन सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरू. बारामतीत 75 टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवू. काँग्रेसचा आजवर कधीच झाला नसेल इतका मोठा पराभव येथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शरद पवार यांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र भाजपची भूमिका अगदी ठाम आहे. बारामतीत काँग्रेसने निवडणूक लढवू नये. दरम्यान, आज भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष संघटनाबाबतही त्यांनी महत्त्वाचे विधान केले. पक्षाचा विस्तार आणि बळकटीकरण हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुण्यात आणि राज्यात, देशभरात भाजपचे संघटन 51 टक्क्यांपेक्षा अधिक नेण्याचा संकल्प केला आहे. युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडणार आहोत. राज्यभर संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.




