युसीसी आणि ‘एक देश, एक निवडणूक’ आमचे पुढील ध्येय

मोदींकडून भविष्यातील योजना

* भाजपच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद

नवी दिल्ली/6 एप्रिल : जागतिक स्तरावर सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपचा आज (6 एप्रिल) 46 वा वर्धापन दिन आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समर्पणाला आणि त्यागाला अभिवादन केलं. तसेच मोदींनी नमूद केले की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला बळकट करण्यासाठी, देशाची सेवा करण्यासाठी, आणीबाणीच्या काळातील आणि काँग्रेस राजवटीतील दडपशाहीपासून ते पश्चिम बंगालसारख्या राज्यांमधील राजकीय हिंसाचारापर्यंत अशा सर्व प्रकारच्या संकटांचा सामना केला आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाला ठाऊक आहे की, प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजप मनापासून प्रयत्न करत आहे आणि भविष्यातही आम्ही असेच प्रयत्न करत राहणार आहोत. भूतकाळात आम्हाला सकारात्मक परिणाम मिळाले आहेत आणि भविष्यातही आम्हाला असेच यश मिळत राहील. कारण ब्रिटिश काळातील शेकडो जाचक कायदे रद्द करणे, आपल्या लोकशाहीसाठी नवीन संसद भवन उभारणे, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करणे, कायद्याद्वारे ‘ट्रिपल तलाक’वर बंदी घालणे, नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणे आणि अयोध्येत राम मंदिराची उभारणी करणे ही भाजपच्या प्रामाणिक प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत. मात्र पक्षाचे हे कार्य अजूनही सुरूच आहे. कारण समान नागरी संहिता आणि ‘एक देश, एक निवडणूक’ यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या देशभरात गांभीर्याने चर्चा सुरू आहे, असे म्हणत मोदींनी भविष्यातील योजना जाहीर केल्या. नरेंद्र मोदी म्हणाले की, जनतेच्या हिताशी संबंधित मुद्दे मांडताना भाजपचे कार्यकर्ते कधीही मागे हटत नाहीत. त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमामुळेच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल आणि याच दृढ विश्वासाच्या बळावर ते प्रत्येक संकटाचा सामना करू शकतील. मग ती आणीबाणी असो किंवा काँग्रेस राजवटीत सोसावी लागलेली दडपशाही असो.

संबंधित बातम्या

Back to top button