जिल्हाधिकार्यांच्या फेक अकाउंटवरुन 65 हजारांनी फसवणूक
चांदुर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चांदुर बाजार / 26 जून : अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावे फेक अकाउंट तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचर विकायचे असल्याची बतावणी करुन चांदुर बाजार तालुक्यातील एका व्यक्तीची 65 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील श्रीधर कुळकर्णी (47, रा. थुगाव पिंपरी, ता. चांदुर बाजार) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरुन चांदुर बाजार पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
सुनील कुळकर्णी यांनी चांदुर बाजार पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावाने समाज माध्यमावर फेक अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरुन जिल्हाधिकारी कार्यालयातील फर्निचर विकायचे आहे, त्यासाठी संतोषकुमार नामक व्यक्तीशी संपर्क साधा अशी पोस्ट करण्यात आली होती. त्यात मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. ही पोस्ट कुळकर्णी यांच्या नजरेस पडली. फर्निचर खरेदीसाठी ईच्छुक असल्याने सुनील कुळकर्णी यांनी सदर मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.
तेव्हा कुळकर्णी यांना संबंधित व्यक्तीने त्याच मोबाईल क्रमांकावर युपीआयद्वारे 65 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. बनावट अकाउंटपासून अनभिज्ञ असलेल्या कुळकर्णी यांनी 65 हजार रुपयांची रक्कम जमा केली. नंतर फर्निचर मिळणे तर दूरच त्यांचा सदर व्यक्तीसोबत संपर्कच होत नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुळकर्णी यांनी चांदुर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. जिल्हाधिकार्यांच्या नावाने फेक अकाउंट उघडून फसवणुकीचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रशासनाच्या आधीच लक्षात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनीही सावध राहून या अकांउंटद्वारे केल्या जाणार्या आवाहनाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.



