बेपत्ता सोनम रघुवंशीला अटक

उत्तर प्रदेशमधील गाझीपूरच्या ढाब्यावरून घेतले ताब्यात

*पतीची हत्या केल्याचा आरोप

नवी दिल्ली/9 जून : गेल्या दोन आठवड्यांपासून सोनम रघुवंशी व राजा रघुवंशी या दाम्पत्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 11 मे रोजी विवाहबद्ध झालेलं हे दाम्पत्य 20 मे रोजी मेघालयमधील शिलाँग येथे फिरण्यासाठी रवाना झालं होतं. पण 23 मे पासून दोघेही बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे अनेक तपास पथकं त्यांचा शोध घेऊ लागली. अखेर 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमध्ये एका मोठ्या खड्ड्यात सापडला. त्यानंतर सोनम रघुवंशीचं अपहरण झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांन केला होता. पण सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. रविवारी 8 जून रोजी रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी सोनम रघुवंशीला ताब्यात घेतलं आणि तिनेच तिच्या पतीची म्हणजेच राजा रघुवंशीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला. मेघालय पोलिसांनी यासंदर्भात दावा केला असून मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीदेखील ही बाब शोधून काढल्याबाबत मेघालय पोलिसांचं कौतुक केलं आहे. या पोर्शभूमीवर गेल्या 10 ते 15 दिवसांमधल्या घडामोडी आणि त्यानंतर सोनम रघुवंशी सापडणं याची जोरदार चर्चा रंगली आहे. मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, राजा रघुवंशीची हत्या सोनमनंच भाडोत्री हल्लेखोरांना सुपारी देऊन करवून घेतली. राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ मेघालयमधील स्थानिक धारदार दाव हे हत्यार सापडलं. यानंच राजाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, सोनमच्या वडिलांनी हे दावे फेटाळून लावत मेघालय पोलिसांवरच गुंडांशी संगनमत करून प्रकरण फिरवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सीबीआय तपासाचीही मागणी केली आहे. त्यामुळे ही हत्या खरंच सोनमनं केली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

कशी सापडली सोनम रघुवंशी?
2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर सोनमचं अपहरण होऊन तिला बांगलादेशला नेण्यात आल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याअनुषंगानेही पोलिसांनी तपास चालू केला होता. पण सोनमचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर रविवारी 8 मे रोजी सोनमचा चुलत भाऊ गोविंद यालाच थेट सोनमचा फोन आल्यानंतर तिचा ठावठिकाणा लागला. सोनमचे वडील देवी सिंह यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यानुसार, रविवारी रात्री गोविंदला सोनमचा फोन आला. आपण उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमधल्या एका ढाब्यावर असल्याचं सोनमनं गोविंदला सांगितलं. दादा मला वाचव, असंही तिनं गोविंदला सांगितलं. गोविंदनं सोनमला ढाब्यावरच्याच एका खोलीत थांबायला सांगितलं. त्यानंतर पोलिसांना कळवलं. त्यानुसार, पोलिसांनी सोनमला ढाब्यावरून ताब्यात घेतलं. सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास गोविंदनं सोनमचे वडील देवी सिंह यांनादेखील ही बाब सांगितली.

संबंधित बातम्या

Back to top button