जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार
6 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

* डीजीपी हरीशकुमार गुप्ता यांची माहिती
नवी दिल्ली/18 नोव्हेंबर – छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी जोरदार चकमक झाली. यामध्ये सहा नक्षलवाद्यांना ठाकर करण्यात आले आहे. यामध्ये बस्तरचा सर्वात जहाल नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजे यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली भागात घडली आहे.
आंध्र प्रदेशातील ग्रेहाउंड सैनिकांकडून मागील काही दिवसांपासून सीमेवर शोध अभियान सुरू आहे. आज सकाळी छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली येथे माओवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान झालेल्या या गोळीबारात दोन्ही बाजूंनी अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांना सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांकडून जंगलात सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच ठेवण्यात आले आहे. हिडमा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियन 1 चा तो प्रमुख होता आणि त्यानंतर सीपीआय (माओवादी)च्या केंद्रीय समितीमध्ये स्थान मिळवणारा बस्तरमधील एकमेव तरुण आदिवासी नेता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. हिडमाच्या नेतृत्वाखालील तुकड्यांनी सुरक्षा दलांवर अनेक घातक हल्ले केले. त्याने आखलेल्या अंबुश तंत्रामुळे अनेक जवान शहीद झाले. याच कारणाने त्याच्यावर केंद्र व राज्य सरकारने एकूण 6 कोटींचे बक्षिस जाहीर केले. सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार , हिडमा हा झालेल्या 26 मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार होता. यात ताडमेटला, बुरकापाल आणि मिनपा येथे झालेले भीषण हल्ले महत्वाचे आहेत . या हल्ल्यांमध्ये अनेक पोलिस जवानांनी प्राण गमावले होते, तसेच सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जात होते. हिडमाच्या मृत्यूमुळे बस्तर, सुकमा, बीजापूर परिसरातील माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला असल्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. संयुक्त दलांनी परिसरात शस्त्रे, दळण-वळण साधने आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. जंगल परिसर पूर्णपणे सील करून उर्वरित माओवादी सदस्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि अत्याधुनिक सेन्सर उपकरणे वापरण्यात येत आहेत.




