सभागृहात ड्रामा चालणार नाही

पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टोलेबाजी

नवी दिल्ली/2 डिसेंबर : आजपासून, (1 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे अधिवेशन 19 डिसेंबरपर्यंत चालणार असून 19 दिवसांमध्ये 15 बैठका होणार आहेत. या काळात अणुऊर्जा विधेयकासह दहा नवीन विधेयके सादर होणार अशी चर्चा रंगली आहे. तसेच, सात राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणूक सुधारणा यादीवरून दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची चर्चा असून डखठ वरून विरोधी पक्ष सत्ताधार्‍यांना घेरणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. सभागृहात ड्रामा नव्हे डिलीव्हरी द्यायला पाहिजे, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विरोधकांनी आपले मुद्दे उचलून धरले पाहिजेत. त्यांनी पराभवाच्या निराशेतून बाहेर पडावे. एक-दोन पक्ष तर असे आहेत, जे पराभवाला पचवू शकत नाहीत. पराभवातून आलेली निराशा वाढू देऊ नका, तर विजयी लोकांनी अहंकार डोक्यावर घेऊ नका. नाटकं करण्यासाठी खूप जागा आहेत. पण, इथे ड्रामा नको तर डिलिव्हरी हवी आहे. संपूर्ण देशात जाऊन घोषणाबाजी करा. इथे घोषणाबाजी नव्हे तर धोरणांवर भर द्या. नकारात्कतेला मर्यादेत ठेवून राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करा. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन ही फक्त एक परंपरा नाही. हे अधिवेशन भारताला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करेल. नुकतेच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. लोकांनी मतदानातून लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवून दिली. विरोधी पक्ष मात्र बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून चिंतेत आहेत. असे म्हणत त्यांनी पुन्हा विरोधकांवर टीका केली.

संबंधित बातम्या

Back to top button