उमेदवारांना 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

मुंबई/28 नोव्हेंबर – राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक प्रचाराबाबत महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने प्रचाराची मुदत एक दिवस वाढवली असून आता उमेदवारांना 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याआधी प्रचाराचा अंतिम दिवस 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे अतिरिक्त कालावधीमुळे प्रचार मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्यास मदत होणार आहे.
आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषद तसेच नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून त्याच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवता येणार आहे. विशेषतः अपक्ष उमेदवार आणि ज्यांना प्रचारचिन्ह उशिरा मिळाले होते त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे. मुदतवाढ जाहीर करताना आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रचार बंद झाल्यानंतर कोणत्याही सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच निवडणुकीसंदर्भातील जाहिराती व प्रसारमाध्यमांवरील प्रचार तत्काळ थांबविणे बंधनकारक राहील. जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी सर्व उमेदवार आणि पक्षांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे निवडणूक वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पर्धा अधिक गतिमान होईल, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.





