सूर्यकांत देशाचे 53 वे सरन्यायाधीश

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची शपथ

* महाराष्ट्रातील सत्तापेचावर निर्णयाचा होणार फैसला

नवी दिल्ली/24 नोव्हेंबर -न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज सोमवारी (ता. 24 नोव्हेंबर) देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे पुढील 15 महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असेल. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (ता. 23 नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आता सूर्य कांत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक नेते ,. सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती -. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते. त्यामुळे हा शपथविधी ऐतिहासिक ठरला आहे. न्यायाधीश सूर्य कांत यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये कलम 370 रद्द करण्याशी संबंधित निर्णय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्वाचे अधिकार यावरील महत्त्वाच्या निर्णय घेतले होते, ज्यामुळे ते त्यासाठी ओळखले जातात. पण आता त्यांच्या या कार्यकाळात त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील सत्तापेच याबाबत निर्णय घेण्याचा मोठा पेच आहे. कारण, नव्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठात महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा अत्यंत संवेदनशील खटला सुरू आहे. शिवसेनेतील फूट, पक्षचिन्ह आणि खर्‍या शिवसेनेचा सवाल यावरून तीन वर्षांपासून सुरू असलेली लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळावे, कोणता गट खराखुरा शिवसेना पक्ष मानला जावा, याबाबतची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून या खटल्याचा निकाल 21 जानेवारी 2026 ला लागणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्य कांत नेमका काय निकाल लावतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. शिक्षणापासूनच त्यांची कायद्याच्या क्षेत्रातील आवड दृढ होत गेली. मेहनत, अभ्यास आणि न्यायनिष्ठा यांच्या आधारावर त्यांनी वकील म्हणून नाव कमावले. 2011 मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्याच्या पदव्युत्तर शिक्षणात प्रथम श्रेणीतील पहिला क्रमांक मिळवणे हे त्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे मोठे उदाहरण मानले जाते. 5 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांची हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून आले. 30 ऑक्टोबर 2024 रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती निश्चित झाली होती. ते या पदाचा कार्यभार 15 महिने सांभाळणार आहेत. 9 फेब्रुवारी 2027 रोजी निवृत्त होतील. न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत. त्यांना 5 ऑक्टोबर 2018 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Back to top button