आज मुंबईत ‘संविधान सन्मान महासभा’
संविधानावर येणार्या धोका-विधानावर वंचित बहुजन आघाडीचे लक्ष

मुंबई/24 नोव्हेंबर – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘संविधान सन्मान महासभा’ उद्या 25 नोव्हेंबर मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. संविधानावरील वाढत्या धोक्यांबाबत नागरिकां मध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबतच संविधान मूल्यांचा गौरव करण्याचा उद्देश या सभेमागे असल्याची माहिती सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
2023 मध्ये संविधान सन्मान महासभा यशस्वीरीत्या पार पडली होती. त्याचप्रमाणे 2024 मध्येही सभा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र विधानसभेच्या कालावधीत झालेल्या राजकीय घडामोडी व निवडणूक प्रचारामुळे सभा तेव्हा घेता आली नाही. तरीदेखील, संविधानाचा सन्मान दरवर्षी करण्याचा निर्धार कायम आहे, असे स्पष्ट करत संविधान हा फक्त कायदा नसून सर्व नागरिकांचे अस्तित्व आणि समानतेचा आधार आहे, याची जाणीव या सभेमुळे अधिक दृढ होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभेतील मतदानातील अनियमिततेबाबतही त्यांनी गंभीर मुद्दे मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार विधानसभेत 67 लाख बोगस मतदान झाल्याची बाब प्रकाश आंबेडकर यांनी आधीच सार्वजनिक केली होती. तसेच उपलब्ध माहितीनुसार संध्याकाळी मतदान बंद झाल्यावरही एकूण मतसंख्या वाढून 76 लाखांपर्यंत पोहोचल्याचे आकडे समोर आले. मतदान प्रक्रिया थांबल्यानंतर संख्या वाढण्याचा प्रश्नच नाही.




