अमरावतीच्या सुरेखा ठाकरे व अमोल मिटकरीसह अनेकांची निवड
राष्ट्रवादी काँग्रेस 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई /13 नोव्हेंबर : गेल्या काही काळात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बर्याच गोष्टींमुळे चर्चेत राहिला आहे. अमोल मिटकरी यांची वादग्रस्त भूमिका तसेच पक्षांतर्गत रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वाद. असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये आधी प्रवक्तेपदावरून वगळण्यात आलेल्या अमोल मिटकरी यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. पण, पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांचे नाव या यादीतही नसल्याने चर्चांना उधान आले आहे. आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध केली. मराठवाड्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सामाजिक सेलचे प्रा.सुनिल मगरे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे यांनाही या यादीत स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये जोरदार मोहीम राबवण्याची तयारी दर्शवली आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर दबाव वाढला आणि त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. पण अजित पवार यांनी त्यांना स्टार प्रचारक पद देऊन त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची सुरुवात केली आहे.




