1800 कोटींच्या जमिनीची 300 कोटींना खरेदी?

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत

* दानवेंचा अजित दादांच्या मुलावर गंभीर आरोप

* कंपनीवर गुन्हा दाखल होणार

पुणे /6 नोव्हेंबर : राज्याच्या राजकारणात एका नव्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने पुण्यातील हायप्रोफाईल अशा कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 40 एकर सरकारी जमीन कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये इतकी होती. पण पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतक्या किंमतीत जमीन खरेदी केली तरी केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच व्यवहाराच्या 48 तासांत उद्योग संचालनालयाने स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर आता या प्रकरणात आणखी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिल्याचं वृत्त टीव्ही 9 ने दिलं आहे. मुद्रांक शुल्क विभागाचे सहनोंदणी महानिरीक्षर रवींद्र मुठे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणात सब रजिस्टरवरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे. मे 2025 खरेदी खद नोंदवण्यात आला आहे. यामध्ये जुना सातबारा म्हणजेच बंद झालेला सात बारा देवून खरेद खद नोंदवण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल संबंधित खरेदी-विक्री करणारे आणि तत्कालीन सब रजिस्टार यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय झालेला आहे. संबंधित सब रजिस्टर यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ज्यांनी खोटे कागदपत्रे देवून शासनाची फसवणूक केली आहे, तसेच ज्यांनी खोटे कागदपत्रे घेऊन संगनमत केलेलं आहे त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे, अशी प्रतिक्रिया सहनोंदणी महानिरीक्षर रवींद्र मुठे यांनी टीव्ही9ला दिली आहे.

* मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस

पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीला आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्कची दोन टक्के रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. अमेडिया कंपनीला दोन टक्के प्रमाणे सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरावे यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button