वाहनांचे पार्ट विकणार्‍या दोन जणांवर क्राईम ब्रँचची कारवाई

लोखंड बाजारात छापा - 3.25 लाखांचा माल जप्त

* बेकायदेशीर स्क्रॅप धंद्यावर पोलिसांचा चाप

अमरावती / 5 नोव्हेंबर – चोरट्यांकडून चोरीला गेलेली दुचाकी व चारचाकी वाहने उघडून त्यांचे पार्ट विकणार्‍या दोघांच्या धंद्यावर शहर क्राईम ब्रांचने थेट धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. ही धाड लोखंड बाजारातील भारत स्क्रॅप व शानू ओल्ड डिस्पोजल या दुकानांवर टाकण्यात आली.
वाहनचोरीच्या मागावरून उलगडा-पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरात वाढलेल्या वाहनचोरी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. 4 नोव्हेंबर) क्राईम ब्रांचचे निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई केली. लोखंड बाजार परिसरात वाहनांचे पार्ट बेकायदेशीरपणे विकले जात असल्याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात उघडे पार्ट जप्त केले. कागदपत्रांशिवाय धंदा सुरू कारवाईदरम्यान आरोपींकडे खरेदी-विक्रीचे कोणतेही कागदपत्र किंवा स्क्रॅप करण्यासंबंधी शासकीय परवानगी नव्हती. चौकशीत दोघेही गप्प बसले. 5 नोव्हेंबर रोजी भारत स्क्रॅपचे संचालक अब्दुल हफीज अब्दुल गनी यांच्या जमील कॉलनीतील मोकळ्या प्लॉटवरून विविध कंपन्यांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर शानू ओल्ड डिस्पोजलचे संचालक ताहेर अली आबिद अली यांच्या दुकानातून दुचाकी व चारचाकी वाहनांचे खुले पार्ट मिळून आले.दोघांकडून मिळालेला एकूण 3 लाख 25 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून क्राईम ब्रांचने पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button