बस-डंपरच्या अपघातात 20 ठार
डझनभर प्रवासी जखमी

* तीन महिन्यांच्या चिमुकलीचाही अंत
तेलंगणा /3 नोव्हेंबर : तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे झालेल्या एका भीषण बस अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढून 20 वर पोहोचली आहे. हा भीषण अपघात हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडळातील मिर्झागुडा जवळ घडला.
तंदूर डेपोची आरटीसी बस आणि गिट्टीने भरलेला टिप्पर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमध्ये भरलेली खडी बसच्या आत कोसळली. यामुळे बसमधील अनेक प्रवासी चिरडले गेले. या भीषण दुर्घटनेत टिप्पर चालकाचाही जागीच मृत्यू झाला, तर डझनभर प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 70 हून अधिक प्रवासी होते. यातील 20 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.जखमींवर चेवेल्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू तेलंगणामधील चेवेल्ला मंडल येथे टिप्पर आणि आरटीसी बसच्या जबर धडकेनंतर अपघातग्रस्त बसमध्ये मोठा
गोंधळ उडाला. अपघातानंतर बसमध्ये आरडा-ओरडा, किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले आणि अफरातफरी माजली. अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. अनेक प्रवासी चिरडले गेले होते, तर जखमींच्या किंचाळ्या, रक्ताने भरलेली सीट असे हृदयद्रावक दृश्य घटनास्थळी दिसत होते. अपघाताचे वृत्त कळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले. बसमधील जखमींना बाहेर काढून उपचारांसाठी चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, अधिकार्यांना तातडीने आवश्यक सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य जलद गतीने पूर्ण करावे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे




