छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

प्रकृती स्थिर, काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला

मुंबई /3 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या राजकार णातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत होते. यानंतर त्यांच्यावर आता हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर
आज भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आज एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी अँजिओग्राफी करण्यात आली. त्या तपासणीअंती डॉक्टरांनी बायपास शस्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानुसार सोमवारी ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील किमान 15 दिवस भुजबळ आराम करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button