17 मुलांना ओलीस ठेवणार्‍या माथेफिरूचा एन्काऊंटर

पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू

* सर्व 17 मुलांची सुखरूप सुटका

मुंबई /30 ऑक्टोबर : मुंबईच्या पवई भागातील आरए स्टुडीओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार आज (30 ऑक्टोबर) दुपारी उघडकीस आला होता. आरोपी रोहित आर्याने व्हिडीओ जारी करताना माझी मागणी मान्य झाली नाही तर या ठिकाणाला मी आग लावून टाकेल, अशी धमकी दिली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी रोहित आर्याला बोलण्यात गुंतवून स्टुडीओच्या बाथरूममधून आतमध्ये प्रवेश केला आणि सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. मात्र स्टुडीओत प्रवेश केल्यानंतर पोलीस आणि रोहित आर्या यांच्यात झटापट झाली. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्या जखमी झाला होता. अशातच आता रोहित आर्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपी रोहित आर्या याने काही मुलांना वेब-सिरीजसाठी ऑडीशन आणि वर्कशॉप घेण्यासाठी काही मुलांना पवई येथील आरए स्टुडीओत बोलावलं होतं. गेल्या 6 दिवसांपासून मुलांचे ऑडीशन सुरू होते. मात्र आज मुले जेवणासाठी बाहेर न आल्याने त्यांना ओलीस ठेवल्याच प्रकार समोर आला. मुले स्टुडिओच्या खिडक्यांमधून बाहेर डोकावताना दिसली. सर्व मुले 15 वर्षांखालील होती. धक्कादायक म्हणजे आरोपी रोहित आर्या याने व्हिडीओ जारी करताना म्हटले होते की, मला काही लोकांना प्रश्न विचारयाचे आहे. मी काही टेररिस्ट नाही. माझी पैशांची मागणी नाही. माझी मागणी फक्त काही लोकांशी बोलण्याची आहे. माझी मागणी मान्य झाली नाही, तर या ठिकाणाला मी आग लावून टाकेल. यासाठी मी जबाबदार राहणार नाही. माझी काही लोकांशी चर्चा झाली तर मी स्वतः बाहेर येईल. मला कोणतीही दुखापत झाली नाही पाहिजे. मी एकटा नाही, अशी धमकी रोहित आर्या याने दिली होती.पोलिसांनी आरोपी रोहित आर्याला बोलण्यात गुंतवून स्टुडीओच्या बाथरूममधून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला आणि सर्व मुलांनी सुखरुप सुटका केली. त्यानंतर रोहित आर्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात माहिती देताना सह पोलीस आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, सर्व मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तसेच रोहित आर्याकडे एअर गन होती आणि त्याच्याकडे काही केमिकलही सापडले आहेत. आतमध्ये एकूण 19 जण होते. यामध्ये एक वरिष्ठ नागरिक तसेच दोन स्थानिकांचा समावेश होता. रोहित आर्याने संबधित मुलांना एका वेब-सिरीजसाठी ऑडीशनसाठी बोलावले होते. त्यामुळे मुलांची सुखरूप सुटका होणे, जे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांच्याशी बोलून इतर काही पोलिसांनी बाथरूममधून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली, अशी माहिती सत्यनारायण चौधरी यांनी दिली. दरम्यान, स्टुडीओमध्ये झालेल्या चकमकीत पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला. यावेळी रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रोहित आर्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळीबार केला. मात्र आज घडलेल्या घटनेने मुंबई हादरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button