12 राज्यांमध्ये राबविणार ‘एसआयआर’

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा

नवी दिल्ली/27 ऑक्टोबर – बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले होते. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या या एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेत जोरदार टीका केली होती, ज्यामुळे राजकारणही तापले होते. अशा परिस्थितीत, केंद्रीय निवडणूक आयोगाने आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. देशातील 12 राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशांत एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. आज निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

बिहारमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व राज्यातील आयुक्तांबरोबर बैठक घेतली, ज्यात एसआयआरबाबत सविस्तर चर्चा झाली. एसआयआरचा मुख्य उद्देश योग्य मतदारांचा समावेश आणि अयोग्य मतदारांचा वगळणे हा आहे, असे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले. दुसरा टप्पा सुरू होत असल्यामुळे आज रात्री 12 नंतर मतदार याद्या गोठवण्यात येणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मते, दुसरा टप्पा 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2025 या कालावधीत घरोघरी जाऊन मतमोजणी केली जाईल. मतदार यादीचा प्रारूप 9 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित केला जाईल. दावे आणि हरकती दाखल करण्याचा कालावधी 9 डिसेंबर 2025 ते 8 जानेवारी 2026 असेल, तर नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींची सुनावणी आणि पडताळणी 9 डिसेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत होईल. अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल.

* कोणत्या राज्यात एसआयआर होणार?

छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुडूचेरी, राज्यस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार या ठिकाणी एसआयआरचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button