पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेचे आत्मसमर्पण
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी

* न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई/26 ऑक्टोबर – फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या डॉक्टर तरुणीने एक चिठ्ठी आणि तळहातावर लिहिलेल्या मजकूरात फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि आणखी एका व्यक्तीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी शनिवारी रात्री उशीरा आत्मसमर्पण केले, त्यानंतर त्याला अटक करून आज फलटणच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले गेले. पोलिसांनी हजर केल्यानंतर न्यायालयाने मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मृत डॉक्टर तरुणीच्या तळहातावर तिच्या आत्महत्येचे कारण लिहिलेले आढळले. याप्रकरणी फलटण ग्रामिण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आरोपींनी शरणागती घेतल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दाशे यांनी दिली आहे. फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अजर्नु काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत या डॉक्टर तरुणीने हॉटेलमध्ये मध्यरात्री उशिरा आत्महत्या केली होती. तिच्या तळहातावर फलटण येथील पोलिस उपनिरीक्षक आणि आणखी एका व्यक्तीमुळे ती आत्महत्येकडे प्रवृत्त झाली असल्याचे स्पष्ट होते.




