स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत प्रचंड वाढ
मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली/26 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 127 व्या भागातून देशवासीयांशी संवाद साधला. या भागाची सुरुवात त्यांनी छठ महापर्वाच्या शुभेच्छांनी केली तसेच अभियंता कपिल शर्मांचे कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले की, छठ हा सण भारतीय संस्कृती, निसर्ग आणि समाजातील अद्भुत ऐक्याचे प्रतीक आहे, ज्यामध्ये समाजातील प्रत्येक घटक छठ घाटांवर एकत्र येतो, हे भारताच्या सामाजिक एकतेचे सुंदर उदाहरण आहे. त्यांनी सर्वांना संधी मिळाल्यास छठ सणात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि याआधी स्वदेशी वस्तूंचा वापर करून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पावले उचलण्याचे देखील सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जीएसटी बचत महोत्सवाबद्दल लोक खूप उत्साही आहेत आणि सणाच्या काळात बाजारपेठेत स्वदेशी वस्तूंच्या खरेदीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यांनी खाद्यतेलाच्या वापरात 10% कपात करण्याचे आवाहन केले आणि लोकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. यासोबतच त्यांनी भारतीय कॉफीबद्दलही भाष्य केले, ओडिशातील कोरापूट कॉफीची चव उत्कृष्ट असल्याचे सांगितले आणि कॉफीची लागवड लोकांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी भारतातील कॉफीची विविधता कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधील प्रमुख कॉफी प्रदेश विषद केली.
बंगळुरूमधील तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या मोहिमेबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी बोलले, ज्यात अभियंता कपिल शर्माच्या टीमने 40 विहिरी आणि सहा तलावांचे पुनरुज्जीवन केले असून कॉर्पोरेशन आणि स्थानिक रहिवाशांचा सहभाग घेतला. त्यांनी भारतीय जातीच्या कुत्र्यांवर देखील चर्चा केली आणि सुरक्षा दलांमध्ये त्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगितले. पर्यावरणावरील सकारात्मक परिणामाबद्दलही त्यांनी माहिती दिली, जसे की खारफुटीचा प्रभाव, डॉल्फिन आणि जलचर प्राण्यांची संख्या वाढ, तसेच स्थलांतरित पक्ष्यांचा मोठ्या संख्येने आगमन. पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आणि 31 ऑक्टोबर रोजी आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ विषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हे गीत भारतमातेची ओढ आणि एकतेची ऊर्जा देणारे आहे. 7 नोव्हेंबर रोजी वंदे मातरम् उत्सवाचा 150 वा वर्धापन दिन साजरा केला जाईल, जे गीत 150 वर्षांपूर्वी रचले गेले होते आणि 1896 मध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम गायले होते.
* ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली
मन की बातच्या 127 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर ही भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे. त्यांनी पुढे सांगितले की, त्यानंतर आणखी एक आनंदाची घटना घडली आहे. एकेकाळी माओवादी दहशतीच्या अंधारात असलेल्या भागातही आता आनंदाचे दिवे पेटले आहेत. पंतप्रधानांनी जोर देऊन सांगितले की, लोकांना त्यांच्या मुलांचे भविष्य धोक्यात आणणार्या माओवादी दहशतीचा पूर्णपणे अंत व्हावा.




