पाकिस्तानकडून सलमान खानचे नाव दहशतवाद्यांच्या यादीत
रियाध फोरममध्ये वक्तव्य केल्याने तिळपापळ

नवी दिल्ली/26 ऑक्टोबर – बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या आठवड्यात रियाध फोरममध्ये सहभागी झाला होता. त्या वेळी त्याने केलेल्या भाषणात पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यामुळे तो आता एका मोठ्या राजनैतिक वादात सापडला आहे. सलमानच्या या भाषणानंतर पाकिस्तान सरकारने त्याचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले असल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहेत. चौथी अनुसूची पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायदा (1997) अंतर्गत तयार केलेली एक यादी आहे, जी दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी कारवायांशी संबंध असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते. या यादीत समाविष्ट केलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवली जाते.
इंडिया टुडेने विविध वृत्तांचा हवाला देत असे सांगितले आहे की, 16 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडिया युजर नासिर अझीमने शेअर केलेली कथित अधिसूचना व्हायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे की सलमान खानला “आझाद बलुचिस्तान फॅसिलिटेटर” या कारणासाठी दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. तथापि, या अधिसूचनेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही आणि कोणत्याही प्रमुख पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिलेले नाही.
रियाध फोरममध्ये बोलताना सलमान खानने सांगितले की, जर तुम्ही हिंदी चित्रपट बनवला आणि सौदी अरबमध्ये प्रदर्शित केला, तर तो सुपरहिट ठरेल; तसेच तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपटही तिथे कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करू शकतात. कारण सौदी अरबमध्ये इतर देशांतून आलेल्यांची मोठी संख्या आहे, त्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेले लोक समाविष्ट आहेत. सलमानच्या या वक्तव्याचे बलुच फुटीरतावादी नेत्यांकडून कौतुक झाले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानचे प्रमुख समर्थक मीर यार बलोच म्हणाले की, सलमानच्या या वक्तव्यामुळे सहा कोटी बलुच लोकांना आनंद झाला आहे. बलुचिस्तानला स्वतंत्र करून सलमानने जे केले, ते अनेक राष्ट्रे करण्यास उदासीन राहतात, असे त्यांनी सांगितले.




