दोन गटात राडा, जमावाने 30 गाड्या पेटविल्या
तब्बल 10 जखमी, 20 जणांना घेतले ताब्यात

अहमदाबाद/18 ऑक्टोबर – गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील माजरा गावात शनिवारी रात्री दोन गटांमध्ये झालेल्या अचानक हिंसक झडपीनं परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला. रात्री सुमारे दहा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि अनेक वाहनांना आग लावली. यामुळे काही घरांच्या खिडक्यांचेही नुकसान झाले. या झडपीत तब्बल दहा जण जखमी झाले असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 20 जणांना ताब्यात घेतले आहे.
साबरकांठा येथील डीवायएसपी अतुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसक घटनेदरम्यान 20 पेक्षा अधिक दुचाकी आणि 10 हून अधिक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांच्या खिडक्याही फुटल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 110 ते 120 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संपूर्ण गावात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सतत गस्त सुरू आहे.




